“मिळाले टक्के,तरच काम ओक्के” असा कारभार चाललाय – माजी राज्यमंत्री बाळा भेगडे

वडगाव मावळ: “मिळाले टक्के,तरच काम ओक्के” असा तालुक्यात कारभार सुरू आहे अशी घणाघाती टिका माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांचे नाव न घेता केली.
नुकत्याच जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद मावळ तालुक्यासाठी विद्यमान सरकारने केली आहे,याची माहिती देण्यासाठी भेगडे यांनी तालुका पक्ष कार्यालयात नुकतेच पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना बाळा भेगडे यांनी सांगितले की मागील अडीच वर्षाच्या काळात मावळच्या प्रथम नागरिकाने “मिळाले टक्के,तरच काम ओक्के” असा कारभार चालवला असून टक्केवारी गोळा करण्यासाठी गावोगाव एजंट नेमलेले आहेत. त्यामुळं मागील अडीच वर्षाच्या काळात मावळच्या विकासाला खीळ बसली असून लवकरच या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करण्यात येईल असा इशारा भेगडे यांनी दिला आहे.

आज सकाळी भाजप पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, गुलाबराव म्हाळस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाळा भेगडे यांनी सांगितले की मागील महाविकास आघाडीच्या काळात मावळच्या विकासाला खीळ बसली होती परंतु आमचे सरकार आल्यानंतर विकासकामांना गती प्राप्त झाली आहे. निगडे येथील भूसंपादन व शेतकऱ्यांच्या मोबदल्याचे काम रखडले होते, कारण केवळ एक व्यक्तीला “टक्के” मिळत नव्हते.परंतु आमचे सरकार आल्यानंतर अवघ्या आठवड्यात तब्बल दीडशे कोटी रुपये संबंधित शेतकरी किंवा जमीन मालकांच्या खात्यावर वर्ग केले आहे. असेच प्रकार पाणी पुरवठा योजना अंमलात आणताना झाले असून उदाहरणादाखल गहुंजे पाणी पुरवठा योजनेत झाला असून तब्बल ५० लक्ष रुपयांची तफावत उघडकिस आली आहे. असेच प्रकार अनेक बाबतीत घडले असून कोट्यवधी रुपयांचा मलिदा “प्रथम नागरिकाने” गोळा केला आहे.याची योग्य त्या शासकीय यंत्रणेमार्फत चौकशी सुरू असून लवकरच आपल्याला कारवाई झालेली दिसेल.
त्याचबरोबर इतर विविध प्रश्नांची उत्तरे भेगडे यांनी दिली परंतु नाव न घेता विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्या कारभाराचे वाभाडे बाळा भेगडे यांनी काढले.
“नारळ फोडण्यापेक्षा काम करा”, नारळ देऊन सत्कार करू असे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी सांगितले.