मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास व स्मृति जागवण्यासाठी कार्ला येथे “दिपोत्सव” साजरा

कार्ला : येथील समर भूमी असलेल्या तलावाकाठी नुकताच शिवप्रेमींच्या उपस्थितीत “दिपोत्सव” साजरा करण्यात आला,यावेळी परिसरातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येथील तलावाच्या काठावर १७७९ साली मराठे व इंग्रज सैन्यादरम्यान तुंबळ लढाई झाली होती.या लढाईत मराठा सैन्याने इंग्रजांना गनिमी काव्याने धूळ चारत नाक मुठीत धरून शरण येण्यास भाग पाडले.त्यामुळे इंग्रजांना इतिहासात प्रथमच नामुष्की पत्करावी लागली व एकतर्फी तह करावा लागला होता. या ऐतिहासिक घटनेची व मराठा सैन्याने गाजवलेल्या पराक्रमाची भावी पिढीला माहिती व्हावी तसेच या घटनेच्या स्मृति जतन करण्यासाठी कार्ला ग्रामस्थ, शिवदुर्ग संस्था व हिंदु समितीच्या वतीने दरवर्षी या ठिकाणी “दिपोत्सव” साजरा करण्यात येतो. याला अनुसरून काल (४ जानेवारी) सायंकाळी तलावाच्या काठावर असलेल्या शिव मंदिराच्या प्रांगणात हा उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी शिवप्रेमी नागरिकांनी पूर्वजांनी गाजवलेल्या पराक्रमाची आठवण व स्मृति जतन करण्यासाठी लवकरच या ठिकाणी “विजय स्तंभ” उभारणार असल्याचे सांगत परिसरातील सर्व शिवप्रेमी नागरिकांनी या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी भारतीय सेना दलातून नुकतेच निवृत्त झालेले व मावळ भूमीचे सुपुत्र सुभेदार कैलास येवले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.त्याचप्रमाणे आनंद गावडे,गुरुप्रसाद पडवळ यांनी ज्वलंत इतिहास आपल्या अमोघ वाणीने उपस्थितांसमोर मांडला.याप्रसंगी उप सरपंच किरण हुलावळे, शिवदुर्ग संस्थेचे सुनील गायकवाड,हिंदु समितीचे चंद्रकांत गाडे, पोलीस पाटील संजय जाधव,भाऊसाहेब हुलावळे, विशाल हुलावळे, संतोष हुलावळे, यांच्यासह अनेक मान्यवर व शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.